…तरच हिंदी चित्रपटांना चांगले दिवस येतील; “पिफ’मध्ये जॉन्ही लिव्हर यांच्या भावना

पुणे – सध्या विनोदी लेखन एक मोठे आव्हान ठरत आहे. हल्ली लोकांना छोट्या मोठ्या गोष्टी सांगून हसवता येत नाही. त्यामुळे चित्रपटासाठी विनोदी संहिता लिहिताना विचारपूर्वक लेखन करावे लागते, असे मत विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी मांडले. टाळेबंदीनंतर युट्यूब, टीकटॉक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांवर अगदी थोडक्यात आणि अधिक विनोदी कंटेंट लोकांना पाहायला मिळत आहे.
त्यामुळे विनोदी संहिता लेखन आव्हानात्मक झाल्याचे जॉनी लिव्हर म्हणाले. ज्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीत कलाकार आपल्या कामासाठी शंभर टक्के मेहनत करतील, त्याचवेळी या चित्रपट सृष्टीला पुन्हा चांगले दिवस येतील, असे त्यांनी नमूद केले. 21 व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत लिव्हर यांनी “ह्युमर इन सिनेमा’ या विषयावर मत मांडले.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. पटेल यांनी जॉनी लिव्हर यांच्याशी संवाद साधला.
यावेळी जॉनी लिव्हर यांनी विनोदामागील प्रेरणा, चित्रपट सृष्टीतील कामाचा अनुभव, अभिनयातील त्यांच्या अडचणी, चित्रपट सृष्टीतील विनोदाचे सध्याचे स्थान अशा विविध विषयावर मनमोकळेपणाने भाष्य केले.





