पुणे | प्रचार फेरीत दहाच वाहनांना परवानगी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचार फेरीत दहांपेक्षा अधिक वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, तसेच दोन ताफ्यातील अंतर दोनशे मीटर आणि पंधरा मिनिटांचे असावे, असे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी कळविले आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शिरूर, पुरंदर, भोर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोंमेंट आणि कसबा अशा ११ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
या मतदारसंघांतील निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार सभा, मिरवणूक, सभेचे ठिकाण आणि वेळ याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना द्यावी. पोलीस परवानगीनंतर सभा, मिरवणुकीचे आयोजन करण्यात यावे. ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे.
रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास बंदी आहे, असे सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. संबंधित आदेश २५ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलिसांचे आदेश काय?
– शाळा, महाविद्यालय, रुग्णालय परिसरात ध्वनिक्षेपकांवर निर्बंध
– प्रचार वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर वाहन थांबवून करावा
– ध्वनिक्षेपक वापराचा परवाना बाळगणे बंधनकारक
– ध्वनिक्षेपक वापर, निश्चित केलेल्या वेळांवर पाेलीस अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे





