पिंपरी | ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग जोरात

पिंपरी, (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांत पक्षांतराच्या हालचाली सरु झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला.
जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी सर्वांच्या हाती शिवबंधण बांधून त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला.
मुंबई, दादर येथील शिवसेना भवनात उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा आज मंगळवारी (दि. ८) पार पडला. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या कार्यकाळात शिवसेनेत जोरदार इंनकमिंग सुरू झाली आहे.
त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील काळात भाजप युवा मोर्चाचे चेतन पवार, राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे, भाजपचे एकनाथ पवार यांनी पक्षात प्रवेश केला.
आज बरकत शेख, मुख्तार शेख, कुदरत शेख, भाजपचे यासीन शेख, जुनेद शेख, अरबाज शेख, अशपाक शेख, अयातुलाह सय्यद, किरण सामंत, मौलाना अब्दुल समद, मौलाना मुख्तार शेख, भाजपचे रशीद शेख, इरफान शेख, भाग्यश्री गरुळे, आकांक्षा गरुळे यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांनी हाती शिवबंधन बांधले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम बांधवांनी पक्ष प्रवेश केल्याने शिवसेना ताकद आणखी वाढली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्य आणि त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेवर विश्वास ठेवून यापुढे शिवसेनेचे निष्ठेने काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लोकप्रियता आणि त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला..
पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम बांधवांनी माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवण्यास हातभार लावला.
मुस्लिम बांधवांनी जो काही विश्वास दाखवला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. – ॲड. सचिन सुरेश भोसले शहरप्रमुख – शिवसेना (उबाठा), पिंपरी-चिंचवड शहर





