Automated Testing Station: पूर्णपणे फिट वाहनेच रस्त्यावर धावावी; ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमध्ये वाहनांची कसून तपासणी
Automated Testing Station: मानवीय हस्तक्षेप नसल्याने अर्ध्याहून अधिक वाहने होताहेत फेल

इनुराद विश्वकर्मा/स्वरुपा जाधव
पिंपरी – रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी करुन प्रमाणपत्र दिले जाते. निश्चित केलेल्या सर्व निकषांवर वाहन पूर्ण उतरल्यास वाहनांना रस्त्यावर धावण्याची परवानगी दिली जाते.
सध्या चिखली येथे सुरू असलेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमध्ये मानवीय हस्तक्षेप टाळून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाहनामधील सर्व त्रुटी शोधल्या जात आहेत. या त्रुटी दूर केल्यानंतरच वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे गेल्या दोन महिन्यांत निम्म्याहून अधिक वाहने तपासणीत फेल झाली आहेत.
एटीएस केंद्राच्या आकडेवारीनुसार, जुलै २०२६ मध्ये २१८ वाहनांची तपासणी झाली. त्यापैकी ८२ वाहने पास, तर १३६ वाहने नापास झाली. ऑगस्टमध्ये आतापर्यंत १६५ वाहनांची तपासणी झाली असून, ६४ वाहने पास तर १०१ वाहने नापास झाली आहेत.
यामध्ये ब्रेक, सस्पेन्शन, स्टिअरिंग, दिवे, उत्सर्जन यांसह विविध बाबींमध्ये त्रुटी आढळल्या. एटीएसमधील तपासणीमुळे वाहनांच्या फिटनेसचा निर्णय केवळ दृश्य तपासणीवर न राहता विविध यंत्रांच्या चाचण्यांवर आधारित होतो. त्यामुळे व्यावसायिक वाहनांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी चिखली येथे ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रात बस, ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनांची तपासणी केली जाते. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ नुसार फिटनेस व उत्सर्जनाची तपासणी होते.
एटीएसमध्ये वाहनमालकाला प्रथम ऑनलाइन बुकिंग करावे लागते. त्यानंतर अपॉइंटमेंट व कागदपत्रांची तपासणी केली जाते. आरसी बुक, पीयूसी आणि विमा तपासल्यानंतर एएनपीआर/क्यूआर कोडद्वारे वाहनाची ओळख पटवली जाते व टेस्ट लेन देण्यात येते. संपूर्ण डेटा एफएमएस प्रणालीत नोंदवला जातो. एका शिफ्टमध्ये सुमारे ३०० वाहनांची तपासणी करण्याची क्षमता येथे आहे.
फिटनेस सर्टिफिकेशन टेस्ट नेमकी काय असते?
वाहनाच्या फिटनेस तपासणीमध्ये ब्रेक, सस्पेन्शन, साइड स्लिप, स्पीडोमीटर, स्टिअरिंग प्ले, जॉइंट प्लेट, हेडलॅम्प अलाइनमेंट तसेच अंडरबॉडी व व्हिज्युअल तपासणी केली जाते. हेडलाइट, हॉर्न, एक्झॉस्टचा आवाज आणि उत्सर्जनाचीही तपासणी होते. स्पीड टेस्टमध्ये तीन रीडिंग घेतली जातात. सर्व डेटा प्रणालीमध्ये नोंदवला जातो.
वाहन पास झाल्यास डिजिटल टेस्ट रिपोर्ट व फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. त्रुटी आढळलेल्या वाहनांना दुरुस्ती सुचवून रिटेस्टची शिफारस केली जाते. वाहनाचे टायर, दिवे, इंडिकेटर, वायपर, हॉर्न, स्पीडोमीटर आणि इतर सुरक्षा उपकरणे कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच एचएसआरपी नंबर प्लेट आणि आवश्यकतेनुसार एआयएस-१४० मानकानुसार जीपीएस यंत्रणा व वैध प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
वाहनधारकांनी घ्यावयाची काळजी
वाहनचालकांनी तपासणीपूर्वी टायर, ब्रेक, सस्पेन्शन आणि स्टिअरिंगची स्थिती तपासावी. हेडलाइट, इंडिकेटर, वायपर, हॉर्न, आरसे आणि स्पीडोमीटर कार्यरत असावेत.
पीयूसी, विमा आणि आरसी बुक सोबत ठेवावे. आवश्यक वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर तसेच एआयएस-१४०, आयआरएनएसएस जीपीएस यंत्रणा कार्यरत असून त्यांची वैध प्रमाणपत्रे आहेत का, हे तपासावे. एचएसआरपी नंबर प्लेट असणेही आवश्यक आहे.
जनजागृतीचा अभाव
वाहन फिटनेस तपासणीबाबत वाहनमालक आणि चालकांमध्ये पुरेशी जनजागृती नसल्यामुळे पास आणि फेल वाहनांच्या संख्येत मोठी तफावत दिसून येत आहे. तपासणीपूर्वी वाहनाची ब्रेक, सस्पेन्शन, स्टिअरिंग, टायर, दिवे, वायपर तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्वतपासणी करून घेणे गरजेचे आहे.
मात्र, अनेक वाहनचालक वाहन थेट फिटनेस चाचणीसाठी आणत असल्याने किरकोळ ते गंभीर त्रुटींमुळे वाहने नापास होत आहेत. त्यामुळे फिटनेस चाचणीपूर्वी वाहनांची आवश्यक तपासणी करून घेण्याबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे.
Lonavala : लोणावळा येथील पूरग्रस्तांचा टाटा कार्यालयावर ठिय्या आंदोलन




