फक्त 30 दिवसांचा साठा उरला! चीनमुळे भारतात वाहन उत्पादन संकटात?

नवी दिल्ली- भारतातील वाहन आणि इतर क्षेत्रातील कंपन्याकडे 30 दिवस पुरेल एवढा रेअर अर्थ मॅग्नेटचा साठा आहे. हा साठा संपुष्टात आल्यानंतर भारतातल वाहन कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे क्रिसिल या संस्थेने या संदर्भात जाहीर केलेल्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ही मॅग्नेट फारसी महाग नसतात. मात्र मोटारी तयार करण्यासाठी यांचा अपरिहार्य म्हणून वापर केला जातो. एकूण वाहनाच्या किमतीत या मॅग्नेटचा वाटा फक्त पाच टक्के असतो. मात्र त्यातील महत्त्वपूर्ण उपकरणांमध्ये हे मॅग्नेट वापरणे अपरिहार्य असते.
मात्र चीनकडे याची उत्पादन आणि प्रक्रिया क्षमता एकवटली आहे. चीन या संबंधात अडवणुकीची भूमिका घेत असल्यामुळे केवळ भारतासमोरच नाही तर जगातील विविध कंपन्यासमोर हे प्रश्न निर्माण झाले असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी भारताच्या कंपन्यांनी 540 टन वजनाचे मॅग्नेट चीनमधून आयात केले. भारताच्या एकूण गरजेचे 80 टक्के इतके मॅग्नेट चीन मधून येतात. चीनने मर्यादा घातल्यामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान या घडामोडींचा मारुती कंपनीच्या उत्पादनावर परिणाम झालेला नाही, असे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले. जपानची आघाडीची वाहन निर्माती असलेल्या सुझुकी मोटरने लोकप्रिय स्विफ्ट मोटारीचे उत्पादन याच कारणाने तात्पुरते थांबविले असल्याचे तीन दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे.





