ऑनलाइन शुभमंगल नोंदणी विनाविघ्न! विवाह नोंदणी विभागाकडून नवीन संगणक प्रणाली तयार

पुणे – मांगल्यमय लग्नसोहळ्याला रुसवा-फुगव्याने लागणारे गालबोट ही सर्वपरिचित बाब. या प्रत्यक्ष सोहळ्याची जशी गत, तशीच ती आजवर ऑनलाइन नोंदणी (कोर्ट मॅरेज) पद्धतीतही जाणवायची. ती केवळ तांत्रिक बिघाडामुळे; पण आता “विवाह नोंदणी 2.0′ ही नवीन संगणक प्रणाली तयार करण्यात आल्याने शुभमंगलचा बार विनाविघ्न उडणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या विवाह नोंदणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही नवी संगणक प्रणाली तयार केली आहे. कोर्ट मॅरेज करू इच्छिणाऱ्या वधू-वरांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, दिलेल्या तारखेनुसार विनाअडथळा विवाह करता येणार आहे.
या वर्षात राज्यात 34 हजारांपेक्षा जास्त व पुणे शहरात 7 हजार 900 पेक्षा जास्त विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत. यापूर्वी विभागामार्फत “ऑनलाइन नोटीस मॅरेज ऍप्लिकेशन’द्वारे ही सेवा देण्यात येत होती. ही प्रणाली कालबाह्य झाली होती. त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विवाह नोंदणी 2.0 ही प्रणाली तयार केली आहे.
प्रमाणपत्र तत्काळ मिळणार
नव्या प्रणालीद्वारे विवाहेच्छुक नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑनलाइन नोटीस देऊ शकतात. त्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन फी जमा करून 30 दिवसांचा नोटीस कालावधी संपल्यानंतर पुढील 60 दिवसांत आपल्या सोयीनुसार विवाहाची तारीख ठरवून त्या तारखेची अपॉइंटमेंट ऑनलाइन घेता येईल. अपॉइंटमेंटच्या दिवशी विवाह नोंदणी कार्यालयात उपस्थित राहून विवाह करता येईल. तसेच विवाह प्रमाणपत्र तत्काळ प्राप्त होईल.
- नोंदणीचे टप्पे…
- www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन “विवाह नोंदणी 2.0′ मध्ये लॉग-इन करणे
- वधू-वरांसह तीन साक्षीदारांची माहिती भरणे. वय व रहिवास संबंधी कागदपत्रे अपलोड करणे
- फोटो अपलोड व आधार पडताळणी करून अर्ज सबमिट करणे
- अधिकाऱ्यांनी नोटीस मान्य केल्यानंतर ऑनलाइन शुल्क भरणे
- विवाहाच्या तारीख बुक करणे
- नियोजित तारखेला मूळ कागदपत्रे घेऊन विवाह नोंदणी कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर विवाह करणे
सद्यस्थितीत पुणे, नगर व सोलापूर या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर “विवाह नोंदणी 2.0′ प्रणाली सुरू करण्यात आली असून, लवकरच ती पूर्ण राज्यात सुरू करण्यात येईल. ही प्रणाली हातळण्यास सुलभ व सोपी आहे, असे नोंदणी व मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक अभिषेक देशमुख म्हणाले.





