Pune District : बारामती बाजार समितीत शासकीय तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी निघत असल्याने समितीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, पुणे व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाच्या पीएसएस योजने अंतर्गत तूर खरेदी करण्याकरिता शेतक-यांची दि. २४ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लि. पुणे यांनी कळविलेले आहे. तरी दि. २४ जानेवारीपासून ३० दिवसांपर्यंत म्हणजे दि. २२ फेब्रुवारीपर्यंत तूर उत्पादक शेतक-यांनी नोंदणी करावी, असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले.
केंद्र शासनाने तुरीचा हमीदर ७५५० रुपये असा निश्चित केल्याने याच दराने वाळलेली व स्वच्छ केलेली तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतक-यांनी नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे. शेतक-यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंद करण्यासाठी जमिनीचा ७/१२ उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला २०२४-२५ पीक पेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि IFSC कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर आदी संपूर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीनुसार दि.२४ जानेवारीपासून ३० दिवसांपर्यंत दि.२२ फेब्रुवारपर्यंत शेतक-यांनी बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे नाव ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीसाठी शेतक-यांनी नीरा संघाचे प्रशांत मदने व बारामती बाजार समितीचे सूर्यकांत मोरे यांच्याशी संपर्क साधावा.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतक-यांची तूर खरेदी करण्यात येणार असल्याने मुदतीत नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर मुदतीत केलेल्या शेतक-यांना एसएसएम द्वारे कळविणेत येईल. त्यावेळी तूर खरेदी केंद्रावर तूर आणताना शासनाचे निकषाप्रमाणे एफएक्यु. दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवून आणावा. तुरीची तपासणी करून तूर खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.





