Online Rummy : ऑनलाइन रमीमुळे अनेक कुटुंबे बेघर; तरुणांनी विकल्या लाखमोलाच्या जमिनी

त्रिभूज शेळके
पारगाव – दौंड तालुक्यात तरूणांनी मोबाइलवर ऑनलाइन रमीचा डाव मांडल्याने शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. यात फक्त दौंड तालुक्यातून दिवसाकाठी सरासरी 40 ते 50 लाखांची उलाढाल होत आहे.
या मोहापायी अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या करामतीमुळे वाडवडिलार्जित जमिनी विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांकडून पालकांमध्ये प्रबोधन करण्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे.
दौंड तालुका औद्योगिक आणि बागायती शेतीमुळे सधन आणि समृद्ध आहे. तालुक्याच्या पश्चिम भाग हा अर्थसंपन्न असून गेल्या वीस वर्षांत तालुक्याचा कायापालट झाला आहे. कुरकुंभसारखी पंचताराकिंत एमआयडीसी जागतिक पातळीवरील दखलपात्र आहे.
ऑनलाइन मार्केटिंगमुळे घरबसल्या सर्व पोहोच होत आहे. अशातच बुद्धीचा खेळ (गेम ऑफ स्किल) म्हणून प्रचलित असणाऱ्या ऑनलाइन रमीने दौंड तालुक्यात शिरकाव केला आहे. तरुणांना आकर्षित केल्याने अनेक तरुण अलगदपणे यात गुरफुटून जात आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात ऑनलाइन रमीचे पेव फुटले आहे.
शेकडो तरुण यात कंगाल झाले आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहत असताना सुरूवातीला हा खेळ खेळण्यासाठी आगाऊ रक्कम (बोनस) दिला जातो. यानंतर तरुण मोठ्या आर्थिक आकर्षणापोटी लाखो रुपयांना चुना लावून घेऊन बरबाद होत आहेत. सहज पैसे कमवायचे स्वप्न दाखवून लोकांच्या घामाची कमाई लुटली जात आहे. जुगारात आपली मुले किती खोल अडकलेली आहेत, हे अद्याप किती तरी पालकांना माहीत नाही.
घरबसल्या खेळला जाणारा हा जुगार अनेकजणांना बेघर करणारा ठरत आहे. क्लासिक रमी, जंगली रमी, ताज रमी, रमी सर्कल, इंडिगो रमी, रमी फैशन, रमी व्हीला, डेक्कन रमी, खेळ प्ले रमी, येस 2 थ्री रमी, आदी अनेक प्रकारच्या रमीचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. मोबाइल, लॅपटॉप, संगणकावर जुगार खेळण्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून जुगार खेळले जात आहे.
पैशाची देवाणघेवाण ऑनलाइन पद्धतीनेच केले जात आहे. हा ऑनलाइन जुगार तरुणांना पोखरू लागला आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. वेळीच लक्ष नाही दिले तर पुलाखालून पाणी वाहून गेलेले असणार आहे. दौंड तालुक्यात अनेक सधन गावांत कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे.
ऑनलाइन ऍपवर कारवाई करून बंदी आणली नाही तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. केरळ राज्यात अनेकांनी हा गेम खेळताना आपले सर्वस्व गमावून हरल्यानंतर आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे केरळ सरकारने ऑनलाइन रमी गेमवर बंदी आणली आहे. महाराष्ट्रात राज्यशासनाने ऑनलाइन रमीवर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे.
महामार्गावरील गावे ऑनलाइनच्या कक्षेत
तालुक्यातील पारगाव, केडगाव, कानगाव, कुरकुंभ, यवत आदी मोठ्या बाजारपेठा आणि सधन गावांत हा ऑनलाइन गेमची तेजी आहे. शेती व्यवसायातून आलेली बरकत आणि औद्योगिकीकरणामुळे अर्थकारणाला मिळालेली चालना आदी कारणांमुळे सुमारे 50 ते 60 टक्के कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत. सोलापूर महामार्गावरील गावे ऑनलाइनच्या आहारी गेली आहेत. काही तरूण छुपे छुपे हा गेम खेळत आहेत.
पहिल्यांदा एक लाख रुपये मिळतात. त्यानंतर तरूणांकडून जादा रक्कम लावली जाते. यात अलगद अडकला जात आहे. पारगाव, कानगाव परिसरातील तरूणांनी भिशी, चिटफंड आदीतून तरूणांनी लाखो रुपयांची रक्कम रमी गेमवर लावली आहे. यात अनेक तरूण बेघर झाले आहेत. काही पालकांनी आपल्या मुलांचे कारनामे उघड झाल्यानंतर शेती जमिनी, घर, जागा विकून ही रक्कम चुकती केली आहे.
ऑनलाइन गेममध्ये तरुणांनी गुंतू नये. विनासायास मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार, या प्रलोभनाला तरुण फसतात. हे तरुण फुरते यात फसल्यानंतर टोकाचा मार्ग निवडतात. तरी तरुणांनी या गेमपासून अलिप्त रहावे. तसेच पालकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे.
– नारायण पवार, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, यवत.





