Pakistan : पाकिस्तानमध्ये ऑनलाइन गैरव्यवहाराचे रॅकेट उद्ध्वस्त ! ७१ परदेशी नागरिकांना अटक

Pakistan – ऑनलाइन गैरव्यवहाराच्या एका मोठ्या प्रकरणी पाकिस्तानमधील प्रशासनाने ७७ विदेशी नागरिकांना अटक केली असून त्यामध्ये ४८ चिनी नागरिकांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली.
मंगळवारी लाहोरपासून सुमारे १३० किमी अंतरावर असलेल्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहरातील एका कॉल सेंटरवर राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने छापा टाकलाआणि १५० जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये चीन, नायजेरिया, फिलीपिन्स, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि म्यानमारमधील संशयितांचा समावेश होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये चीनमधील ४४ पुरुष आणि चार महिला, नायजेरियातील तीन पुरुष आणि पाच महिला, फिलिपिनमधील तीन, श्रीलंकेचे दोन, बांगलादेशातील सहा, झिम्बाब्वेतील एक आणि म्यानमारमधील दोन महिलांचा समावेश आहे. हे परदेशी लोक बँकिंग सिस्टम हॅक करण्यात आणि विविध सायबर गुन्हे करण्यात गुंतले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे कॉल सेंटर एका माजी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या मालकीचे असून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या फसव्या योजनांशी देखील याचा संबंध जोडला गेला आहे. या फसव्या योजनांमधून शेकडो जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली गेली आहे. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





