Online Drug Sale : ड्रग्ज विक्रीसाठी ऑनलाइन ॲपचा वापर? शिरुरमध्ये ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Online Drug Sale : पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेची शिरुर परिसरात मोठी कारवाई; ४७ ग्रॅम मेफेड्रोनसह दोन मोटारी आणि मुद्देमाल जप्त.
Online Drug Sale – मेफेड्रोन (एमडी) विक्री करणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. शिरुर परिसरात ही कारवाई केली असून आरोपींकडून ४७.६० मेफेड्रोन, दोन मोटारी, अन्य साहित्य असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशाल मारुती मोरे ( २०, रा. बाफनामळा, शिरुर, जि. पुणे), प्रतीक संतोष लंघे ( २५, रा. करडे, ता. शिरुर, जि. पुणे),
मिथून विजयपाल सिंग ( २६, रा. सावताामाळीनगर, शिरुर, जि. पुणे) यांना अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना न्हावरे फाटा येथील मंगल कार्यालयासमोर दोन मोटारी थांबलेल्या आढळल्या. या मोटारीतील संशयित मेफेड्रोन विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्यांना अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक निरीक्षक राहुल गावडे आणि पथकाने ही कारवाई केली. आरोपींच्या चौकशीवेळी त्यांनी मेफेड्रोन ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून खरेदी केल्याचे सांगितले. आरोपींपर्यंत अमली पदार्थ पोहचविणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पुरवठादाराचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींचे रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहेत.





