Online Banking Fraud : बँकेचा पासवर्ड अपडेट करणं पडलं महाग; देहूगावच्या तरुणाला ६ लाखांचा ‘ऑनलाइन’ गंडा
Online Banking Fraud : बँक ऑफ महाराष्ट्रचे 'महा मोबाईल प्लस' ॲप वापरताना पासवर्ड अपडेटची सूचना आली आणि काही मिनिटांतच बँक खाते रिकामे झाले.
Updated On:

Online Banking Fraud – बँक अप्लिकेशनचा पासवर्ड अपडेट करण्याच्या नादात एका तरुणाची ६ लाख ९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. ही घटना ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास देहूगाव येथील अभिलाषा पार्क, परंडवाल चौक परिसरात घडली.याबाबत श्रीराम रावसाहेब गिते (वय ३२, रा. परंडवाल चौक, देहूगाव) यांनी शनिवारी (दि. २४) रोजी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही फसवणूक कॅनरा बँक आणि एन.एस.डी.एल. पेमेंट बँकेच्या विविध अनोळखी खातेधारकांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मोबाईलवर बँक ऑफ महाराष्ट्रचे ‘महा मोबाईल प्लस’ ॲप वापरत असताना त्यांना नवीन पासवर्ड टाकण्याची सूचना आली. नवीन पासवर्ड टाकताच ते ॲपमधून बाहेर पडले आणि त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या कंपनीचे मेसेज येऊ लागले.
तपासणी केली असता, त्यांच्या खात्यातून ४ लाख ८५ हजार रुपये, ५० हजार रुपये आणि ३९ हजार रुपये अशा वेगवेगळ्या रकमा इतर खात्यांवर वर्ग करण्यात आल्या होत्या, तसेच ए.टी.एम. स्वॅपद्वारे ३५ हजार रुपये काढले गेले होते. देहुरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





