पटियाला: पंजाब पोलीस दलातील माजी आयपीएस अधिकारी आणि निवृत्त महानिरीक्षक (IG) अमर सिंह चहल यांनी सोमवारी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली असून, यामागे मोठे आर्थिक नुकसान आणि ऑनलाइन फसवणूक कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पटियाला येथील आपल्या निवासस्थानी अमर सिंह चहल यांनी स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबीयांनी धाव घेतली आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा घटनेची माहिती मिळताच पटियालाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) वरुण शर्मा यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चिठ्ठी (सुसाईड नोट) हस्तगत केली आहे. या नोटमध्ये चहल यांनी ‘ऑनलाइन आर्थिक फसवणूक’ झाल्याचा उल्लेख केला आहे. या फसवणुकीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यातून आलेल्या मानसिक तणावामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. वादग्रस्त प्रकरणांशी संबंध निवृत्त आयजी अमर सिंह चहल हे गेल्या काही काळापासून चर्चेत होते. २०१५ मधील बहुचर्चित बेहबल कलान आणि कोटकपूरा गोळीबार प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते. २०२३ मध्ये पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात चहल यांच्या नावाचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास एडीजीपी एल.के. यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. “आम्ही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सुसाईड नोटची सत्यता पडताळली जात आहे. ऑनलाइन फसवणुकीचे स्वरूप नेमके काय होते आणि त्यात कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सायबर सेलच्या मदतीने केला जात आहे,” अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.