कांदे पोहे

ही मराठी कुटुंबातली शॉर्ट फिल्म हिंदीमध्ये घेतली आहे. लग्न जमवताना आपल्याकडे आईवडिलांसमवेत मुलगा व मुलगी समोरासमोर येतात. सगळं ठीक वाटलं तर मग तिथेच बाजूला दोघांना बोलायला देतात. आणि अशा प्रसंगी सहसा कांदे-पोहे खायला करतात. तर असाच कांदे-पोह्याचा कार्यक्रम चाललेला असतो. एका बाजूला आई आणि एका बाजूला वडील यांच्यामध्ये आज्ञाधारक चेहरा करून मुलगी बसलेली असते. लग्न करू इच्छिणारा मुलगा आणि त्याचे आईवडीलही औपचारिक बोलत तिथे बसलेले असतात. एकमेकांना कुटुंबाविषयी माहिती दिली-घेतली जाते. मुलीचे वडील मुलाकडच्यांना कुंडली देतात आणि सांगतात की, “मी पत्रिका पाहिल्या आहेत आणि आमच्या गुरुजींनी मुलाचे व मुलीचे बत्तीस गुण जुळताहेत असे सांगितले आहे.’ ते हे बोलल्याबरोबर आतापर्यंत गप्प बसलेले मुलगा-मुलगी एकदमच उद्गारतात, “माझा यावर विश्वास नाहीय.’ सगळ्यांना हसू येते आणि वडील म्हणतात, “म्हणजे आता तेहत्तीस गुण जुळतात.’
मुलाची आई मुलीला म्हणते, “तुला काही सांगायचेय, विचारायचेय का?’ ती खाली मान घालून “नाही’ म्हणते. मग मुलाची आई म्हणते, “तुम्हा दोघांनाच बोलायचे असेल तर तसे बोला.’ लगेच मुलीचे वडील तिच्या धाकट्या भावाला म्हणतात, “जा रे, ह्यांना आपली गच्ची दाखव.’ मुलगा त्या भावाबरोबर जातो. मुलीच्या हातात सारखा मोबाइल. तो ओढून घेत तिची आई तिलाही वरती पाठवते. गच्चीत फुलझाडे असतात. भाऊ त्या मुलग्याला त्यातले एक फूल काढून देतो आणि ते त्याने आपल्या बहिणीला द्यावे असे सुचवतो. एकंदरीत त्याची भूमिका सहकार्याची दिसते. तेवढ्यात मुलगी पोचतेच. भाऊ जरा बाजूला खुर्ची घेऊन बसतो. हे दोघे एकमेकांशी बोलायला शब्द शोधू लागतात. मुलगा अडखळत चौकशी करतो, “आईवडिलांच्या आग्रहामुळे तुम्ही हे लग्न करीत नाहीय ना? तुमचा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का? या लग्नासाठी तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?’ तिचा सोज्वळ चेहरा पाहून असे प्रश्न मनात येणे साहजिकच असते. ती फक्त “नाही’ म्हणते. मग हा म्हणतो, “शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी वगैरे करणार ना? …म्हणजे माझ्या मित्रांच्या सगळ्या बायका करतात. माझे विचार फॉरवर्ड आहेत. मला आवडेल बायकोने बाहेर जाऊन नोकरी वगैरे केलेली.’ हे ऐकल्यावर ती भावाकडे पाहते. तो “गो अहेड’ अशी खूण करतो.
यानंतर ती चांगलीच धीट होते आणि म्हणते, “काम तर मी करतच राहणार. माझं करिअर मी सोडणार नाही.’ काही न कळून मुलगा म्हणतो, “म्हणजे? तुम्ही ऑलरेडी जॉब करताय?’ त्याचा हा प्रश्न ऐकल्यावर ती भावाकडून मोबाइल घेते आणि त्याला आपले व्हिडिओज दाखवते. हा हसतो आणि म्हणतो, “हे करिअर? हा तर टाइमपास आहे. मी कमाई करून देणारा जॉब म्हणतोय.’ मघाशी खालमानेने शालीन होऊन बसलेली ती मुलगी आता एकदम बोल्ड होते. त्याला म्हणते, “सुपारी मिळते ना याची… वीस-पंचवीस हजार मिळून जातात एका व्हिडिओचे.’ ह्याला हे सगळेच नवे असते. तो विचार करून म्हणतो, “पण हे कधीतरी… कायमची नोकरी वेगळी…’ ही एकदम आत्मविश्वासाने म्हणते, “असं काही नाही. मला बिग बॉसमध्ये जायचा चान्स मिळू शकतो. तेव्हा भरपूर पैसे मिळतील. मग मी सलमान वगैरे कोणाच्या तरी नजरेस पडेन.’ मुलगा टिपिकल मध्यमवर्गीय. त्याला वाटते, ही फारच मोठी स्वप्ने पाहते आहे. तो हसून म्हणतो, “म्हणजे ऍक्टर?…’ ती शांतपणे फुल कॉन्फिडन्समधे म्हणते, “स्टार!’ तो पुरताच गोंधळून जातो. भाऊ पुढे येतो आणि म्हणतो, “पन्नास लाख फॉलोअर्स आहेत तिचे.’ तो चकित! ही एकदम जोशात!
ती म्हणते, “बरं चल, तू माझ्याशेजारी उभा राहा. आपला फोटो टाकते मी वॉलवर. माझे फॉलोअर्स काय म्हणतात पाहू या.’ हा जाम नर्व्हस. म्हणतो, “म्हणजे पन्नास लाख माणसं मला जज करणार? त्यांनी मला पसंत केलं तर तू माझ्याशी लग्न करणार? मला त्यांनी नापास केलं तर?’ ती हसून म्हणते, “बाकीच्या मुलांचीही मला स्थळं आली होती. त्यांचं जे झालं तेच तुझंही होईल.’ तो निराश होऊ लागतो. त्यांचा एकत्र फोटो व्हायरल होतो. त्याला वाटतं, आतापर्यंत जसे तिने इतर मुलांना नकार दिले, तसाच आता आपल्यालाही ती नकार देणार. त्याला तर ती आवडलेली असते. तेवढ्यात ती म्हणते, “फॉलोअर्सना आवडला नाही म्हणून मी नव्हता त्या मुलांना नकार दिला. त्यांच्याबरोबर फोटो काढलाच नव्हता मी.’ आणि मग मिस्किलपणे त्याला म्हणते, “आहेस खरा फॉरवर्ड आणि… क्यूटसुद्धा!’ त्याचा प्रामाणिकपणा, काहीसा निरागसपणा, पूर्वग्रह न ठेवता तिला जाणून घेणं… हे सारे तिला फार आवडते. नंतर एकदम एक असा व्हिडिओ आपल्याला दिसतो की, या दोघांचा मिळून तो तयार केलेला असतो. हे व्हिडिओ चांगलेच हिट होतात. तिची नेहमीची बिनधास्त अदाकारी आणि ह्याचा गोंधळलेला भाबडेपणा… अशी जोडी एकदम लोकप्रिय होते. थोडक्यात “कांदे-पोहे’ चे आता “शुभ-मंगल’ झालेले असते!
मायक्रोफिल्म
माधुरी तळवलकर





