Onion Express : नाशिकमध्ये कांदा एक्सप्रेस रोखली; गणेश निंबाळकर यांचा गंभीर आरोप
देशांतर्गत बाजारात कांद्याचे (Onion Express) दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांदा पुरवठा सुरू केला आहे.

Onion Express : देशांतर्गत बाजारात कांद्याचे (Onion Express) दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांदा पुरवठा सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने लासलगाव रेल्वे स्थानकातून दिल्लीसाठी मालगाडीची व्यवस्था करण्यात आली.
मात्र, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांनी अचानक मालधक्क्यावर येऊन कांदा एक्सप्रेस (Onion Express) रोखून धरली. निंबाळकर यांनी कांदा एक्सप्रेससमोर रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केले.
आधीच सोपस्कार आणि पॅकिंगअभावी १६ तास रखडलेली ही मालगाडी अखेर बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी ती रोखली. रेल्वेमध्ये सडका आणि खराब कांदा पाठविला जात असल्याचा आरोप केला. रेल्वेत भरलेल्या कांद्याच्या गोण्या उघडून दाखवाव्यात, अशी मागणी करत निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वेसमोर बसून आंदोलन (Onion Express) केले. हा कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील शेतमालाचे भाव पडतील, असा पवित्रा त्यांनी घेतला. या प्रकारामुळे सुमारे एक तास मालगाडी रखडली. घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे अधिकारी आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना बाजूला केले.
मात्र निंबाळकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मालधक्क्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर तीन वाजेच्या सुमारास मालगाडी दिल्लीकडे रवाना झाली. दरम्यान, एकीकडे साखरेचे भाव वाढले असताना दुसरीकडे कांद्याच्या वाढत्या किमतींमुळेही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
कांदा दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे, नाशिकहून 800 टन कांदा घेऊन येणारी कांदा एक्सप्रेस दिल्लीत दाखल होणार आहे. सरकार हा कांदा सर्वसाधारण बाजारभावापेक्षा कमी, म्हणजेच 35 रुपये प्रति किलो दराने विकण्याची तयारी करत आहे. हा कांदा नाफेड एनसीसीएफ आणि सेंट्रल वेअरहाऊसच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध होईल.






