Satara: सातारा तालुक्यात ९५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
Satara मागील वर्षी ७१ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली होती.

Satara: गणेशोत्सव म्हटले की ढोल-ताशे, डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि मिरवणुकीतील धांगडधिंगा, असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, सातारा तालुका पोलिसांनी यंदा या चित्राला वेगळे वळण देत ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ९५ गावांमध्ये एकच गणपती बसविण्यात येणार असून, १२१ गणेशोत्सव मंडळांनी डीजे आणि आवाजाच्या भिंतींना फाटा देत गणेशमूर्तीची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्धार केला आहे.
सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १५३ गावे असून, त्यामध्ये तब्बल ३८९ गणेश मंडळे आहेत. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात तसेच ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरा व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजेधारक, बँजो मालक तसेच ग्रामस्थांना ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह सातत्याने बैठका घेत ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. त्याला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मागील वर्षी ७१ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली होती. यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा ९५ गावांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे १२१ मंडळांनी डीजे, ध्वनीवर्धकाशिवाय गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवातील अनावश्यक स्पर्धा, ध्वनिप्रदूषण आणि खर्चाला आळा बसण्यास मदत होणार असून सामाजिक सलोखा आणि एकजुटीलाही बळ मिळणार आहे. गणेश मंडळांनी घेतलेला हा निर्णय इतर मंडळांसाठीही आदर्श ठरावा, असे आवाहन सातारा तालुका पोलिसांकडून करण्यात आले आहे.





