भिगवण – मदनवाडी (ता. इंदापूर) येथे आज एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. रोहन कुंभार यांनी दिली. मदनवाडी येथील व्यक्ती पुणे येथे उपचारासाठी गेली असता त्या ठिकाणी केलेल्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मदनवाडी येथे रुग्ण आढळून आल्याने भिगवण परिसरातील करोनाची साखळी तुटली नसल्याचे दिसून येत आहे.
येथील रुग्णाच्या संपर्कातील सात, भिगवण येथील एक व भिगवण स्टेशन येथील चार अशा बारा व्यक्तींना चाचणीसाठी इंदापूर येथे पाठवण्यात आले आहे. (दि.28) एप्रिल रोजी भिगवण स्टेशन येथे एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अडीच महिन्यांचा काळ करोनामुक्तीचा होता.
पण (दि.11) भिगवण स्टेशन येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्टेशन येथे पाच रुग्ण आढळून आले. अकोले येथे 11 रुग्ण आढळून आले आहेत. भिगवण येथील 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. मदनवाडीतील रुग्णासह परिसरातील अठरावा रुग्ण आहे.