nagar | एक व्यक्ती, 13 जनावरे मृत्यूमुखी, तर 31 घरांची पडझड

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या विविध भागात शुक्रवारी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे एका व्यक्तीसह १३ लहान-मोठे जनावरे आणि ३१ घरांची पडझड झाली आहे. यासह अनेक तालुक्यात शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याठिकाणी पंचनामे सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात शुक्रवारी कर्जत, कोपरगाव, पारनेर, नगर शहर, अकोले या तालुक्यात जोरदार अवकाळीसह अन्य तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळ्या. यावेळी झालेल्या वादळात वीज पडून अकोले तालुक्यातील एक व्यक्ती मयत झाली असून संगमनेर तालुक्यात २,
कर्जत तालुक्यात २, जामखेड तालुक्यात १ आणि पारनेर तालुक्यात ८ शेळ्या अशा लहान-मोठ्या १३ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यासह कर्जतमध्ये २१, कोपरगावमध्ये ७ आणि पारनेर तालुक्यात ३ अशा ३१ घरांची पडझड झालेली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही कर्जतच्या भांबोरामध्ये ४५ मि.मी., कोपरगाव २६ मि.मी. संगमनेर तालुक्यातील डोळसणे आणि घारगाव प्रत्येकी २१ मि.मी., अकोले तालुक्यातील साकीरवाडी १८, राजूर १८, शेंडी १८ मि.मी., कोतुळ १८ मि.मी. आणि ब्राम्हणवाडा या महसूल मंडळात १५ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी या अवकाळीमुळे जिल्ह्यात काही तालुक्यात शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झालेले असून त्याठिकाणी पंचनामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.





