बार असोसिएशनच्या अध्यक्षांमुळे वाचला प्राण दौंड – दौंड न्यायालयातील वकील बार रूम समोरील मोकळ्या जागेत (दि.१७) रोजी सकाळी एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गिरमकर व पक्षकार इसाक मेहबूब शेख यांच्यामुळे मोठा अनर्थ टळला. मोहन दशरथ वीरकर (वय ४५, रा. लोखंडे वस्ती, दौंड) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे वीरकर यांच्यासोबत त्यांची दोन लहान मुले देखील उपस्थित होती. त्यांनी न्यायालय आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गिरमकर, पक्षकार इसाक मेहबूब शेख यांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वीरकर यांना ताब्यात घेतले. दरम्यान, दौंड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत गिरमकर, ॲड. अझरूद्दीन मुलाणी, ॲड. रुपचंद अंबोदरे, इसाक मेहबूब शेख (पक्षकार) यांनी धैर्य दाखवत पेट्रोलची बाटली काढून घेत आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. मोहन वीरकर यांनी काही वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करीत त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समुपदेशनासाठी ताब्यात घेतले. आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गिरमकर व इसाक मेहबूब शेख यांच्यामुळेच एका कुटुंबाचा जीव वाचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.