नागपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी
Updated On:

नागपूर – नागपूरमधील काटोल तालुक्यातील चाकडोह, बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी आज राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, मृतांच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी सरकार घेणार असल्याची घोषणा आज सरकारकडून विधिमंडळात करण्यात आल्या आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधान परिषदेत घोषणा केली.
संरक्षण क्षेत्राला स्फोटके आणि शस्त्रात्रे पुरवणाऱ्या तसेच सुमारे 30 देशांना निर्यात करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या आयुध निर्माण कारखान्यात काही दिवसांपूर्वी स्फोट झाला होता.
या स्फोटाचा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. त्यानंतर आज विधान परिषदेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्य सरकारच्या वतीने मदतीची घोषणा केली.





