प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना; छोट्या पडद्यावर कमबॅक करत म्हणाला…

Shantanu Moghe : पवित्र रिश्ता आणि अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. तिची अकाली एक्झिटने अनेकांना मोठा धक्का बसला. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी प्रियाविषयी असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रियाच्या निधनाने तिचा पती आणि अभिनेता शंतनू मोघे याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता तो या धक्क्यातून हळूहळू सावरत असून, त्याने येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
या मालिकेचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील टीझरमध्ये त्याची एन्ट्री दाखविण्यात आली आहे. या पोस्टवर रसिक प्रेक्षक कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शंतनु मोघे याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुर्नरागम केल्यानंतर आणि पत्नी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर पहिल्यादांचा आपल्या भावना व्यक्त केल्या.
आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो, अशी प्रतिक्रिया अभिनेता शंतनू मोघेने दिली आहे.
काय म्हणाला शंतनू मोघे?
मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं, म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही. आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला लागलो आहे. कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे मला नेहमी सांगायचे, आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो.
हीच प्रियाला श्रद्धांजली
कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली असल्याचं शंतनू म्हणाला. आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे, असंही तो पुढे बोलताना म्हणाला. तसेच त्याने स्टार प्रवाह वाहिनी आणि सतीश राजवाडे तसेच सोल प्रॉडक्शन हाऊसचे आभार मानले.
हेही वाचा : Dipika Kakar : दीपिका कक्करला स्टेज-२ लिव्हर कॅन्सर, अनुभव सांगताना डोळ्यांत आले अश्रू





