Israel – Iran war: ‘एका मैत्रीसाठी दुसरी मैत्री तोडू नये’; इराणच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा
Israel - Iran war: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व बाजूंनी संयम बाळगण्याचे आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

Israel – Iran war: इराणमधील सत्ताधारी नेत्यांच्या हत्या आणि त्यानंतर निर्माण झालेल्या संघर्षावर केंद्र सरकारने बाळगलेल्या मौनावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या परराष्ट्र धोरणाचा दाखला देत, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे.
इंदिरा गांधींच्या भूमिकेची आठवण –
काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, १९८२ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये बोलताना इंदिरा गांधींनी “एका मैत्रीसाठी दुसरी मैत्री आड येता कामा नये” असे स्पष्ट केले होते. हेच सूत्र दशकानुदशके भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आधार राहिले आहे. मात्र, सध्याच्या काळात इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या हत्यांनंतरही भारताने साधी निषेधार्ह टिप्पणी देखील केली नाही, याबद्दल काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केले आहे.
“One friendship doesn’t come in the way of another,” Indira Gandhi said at the White House in 1982.
That line defined India’s foreign policy for decades. We were non aligned. We had relations with the US, the Soviet Union, Iran and many others at the same time. We did not treat… pic.twitter.com/s3K2LhEx7q
— Congress Kerala (@INCKerala) March 2, 2026
काँग्रेसच्या टीकेचे प्रमुख मुद्दे:
भारत जर सार्वभौमत्वाचा पुरस्कार करतो, तर मग निवडक ठिकाणीच भूमिका का घेतली जाते? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. भारत आणि इराण (तत्कालीन पर्शिया) यांचे संबंध ३,००० वर्षांपूर्वीचे आहेत. १९५० मधील मैत्री करार असो किंवा १९७९ ची क्रांती, भारताने नेहमीच इराणशी संतुलित संबंध ठेवले आहेत. इराण हा भारताचा मुख्य तेल पुरवठादार देश राहिला आहे आणि चाबहार बंदरासारख्या प्रकल्पांत भारताची मोठी गुंतवणूक आहे.
“जेव्हा इराणी नेत्यांची हत्या झाली, तेव्हा भारताने किमान निषेध व्यक्त करणे अपेक्षित होते. कोणतीही ठोस भूमिका नाही, केवळ शांतता. ही शांतता भारताच्या अलिप्ततावादी धोरणाला तडा देणारी आहे,” असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
विरोधकांचा एकत्रित हल्लाबोल –
केवळ काँग्रेसच नव्हे, तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सरकारला या आंतरराष्ट्रीय विषयावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. तर आरजेडी खासदार मनोज झा यांनी सध्याच्या परिस्थितीला ‘मध्ययुगीन रानटीपणा’ संबोधत सरकारच्या मौनाचा निषेध केला.
#WATCH | Delhi | RJD MP Manoj Kumar Jha says, “Political differences are one thing. Foreign policy belongs to the nation. Many governments have come and gone in the country… The silence I’m witnessing is making a lot of noise… This is an era of medieval barbarism… At the… pic.twitter.com/5XCY2YjsJu
— ANI (@ANI) March 2, 2026
पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारची बाजू –
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघर्षावर चिंता व्यक्त केली असून ‘संवाद आणि मुत्सद्देगिरी’ हाच तोडगा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. युएईवरील हल्ल्यांचा निषेध करत त्यांनी तिथल्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला.
परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका:
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व बाजूंनी संयम बाळगण्याचे आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही इराण आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.





