मोराच्या शिकारीप्रकरणी एकास अटक

कराड -आटके, ता. कराड येथे मोरासह लांडोरची शिकार केल्याप्रकरणी एकास वनविभागाने सोमवारी दुपारी अटक केली आहे. संशयिताने दोन मोरांसह सात लांडोर मारल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले असून त्याच्याकडे तपास सुरू आहे.गोरख राजेंद्र शिंदे (वय 32) सध्या रा. कृष्णा कारखाना परिसर, ता. कराड, मुळ रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आटके ता. कराड येथे मोराची शिकार केली जात असल्याची माहिती वन विभा गाला मिळाली. या माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने आटकेतील कृष्णा नदीपात्रालगत असलेल्या खटकुळी, सावराई मळी नावच्या शिवारात छापा टाकला. त्यावेळी संशयित गोरख शिंदे हा दोन मोर आणि सात लांडोरची शिकार करुन त्यांना प्लास्टिकच्या पोत्यात भरुन तेथून निघण्याच्या तयारीत होता. त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून शिकार केलेले मोर, लांडोर, एक दुचाकी व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे.





