दीड लाख मुंबईकरांनी डाऊनलोड केले ‘मुंबई वन’अॅप

मुंबई : ‘मुंबई वन’ अॅप मुंबईकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करणाऱ्या तब्बल दीड लाख मुंबईकरांनी पहिल्या तीन-साडेतीन दिवसांतच हे अॅप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे ‘मुंबई वन’ हे अॅप लवकरच क्रमांक एक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन महसुलातही भर पडणार आहे. महामुंबई मेट्रोच्या ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्रात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी वाढल्याने सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो, लोकल आणि बससारख्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांना ‘मुंबई वन’ अॅपद्वारे एकत्र आणण्यात आले आहे. या अॅपमुळे प्रवाशांना मेट्रो, लोकल आणि बसचे तिकीट ऑनलाइन बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या अॅपचे लाँचिंग करण्यात आले. पहिल्याच आठ तासांत तब्बल ३५ हजार मुंबईकरांनी अॅप डाऊनलोड केले, तर साडेतीन दिवसांत हा आकडा दीड लाखांवर पोहोचला. दर तासाला दोन ते अडीच हजार नागरिक अॅप डाउनलोड करत असल्याचे नोंदवले गेले आहे. पुढील वर्षभरात तब्बल ५० लाख मुंबईकर ‘मुंबई वन’ वापरणार असल्याचा दावा महामुंबई मेट्रो प्रशासनाने केला आहे.
‘मुंबई वन’ अॅपमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, विनातिकिट प्रवासाला आळा बसेल. तसेच मेट्रो, बेस्ट आणि लोकलसह इतर वाहतूक व्यवस्थांचा महसूल वाढण्यास मदत होईल. अॅपचा वापर सुलभ व्हावा म्हणून मेट्रोकडून ‘वाय-फाय’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अॅप वापरताना कोणतीही अडचण येणार नाही, याची खात्री करण्यात आली आहे.





