‘म्हणून आम्हाला बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला…’; अखेर शिंदेंनी सांगितलं खरं कारण, वाचा…

Eknath Shinde On Uddhav Thackeray – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. मात्र ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे सरकार येण्याआधी यांच्या (उद्धव ठाकरे) ईगोमुळे कामे अडली होती.
लोकांच्या कामासाठी यांनी ईगो बाजूला ठेवायला पाहिजे होता. मुंबईकर, मुंबईकर म्हणतात, पण मुंबईकरांसाठी यांनी काही केले का? असा प्रश्न उपस्थित करत मुंबईच्या बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत मुंबईत आणणे हेच आमचे व्हिजन आहे आणि डेव्हलपमेंट हाच आमचा मुद्दा आहे. महायुतीचा अजेंडा हा विकासाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, माझं एक प्रामाणित मत आहे, जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसने अपशब्द वापरले होते, तेव्हा हिंदूत्व हिंदूत्व म्हणणारे शांत बसले होते. त्यांना आता सावरकर नको आहेत, त्यांना औरंगजेब चालतो हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे.
म्हणून आम्हाला बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्रीपदासाठी यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेबांचे विचार सोडले. ते आता काँग्रेसची भाषा बोलू लागले आहेत आणि काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणाकडे? धनुष्यबाण कोणाकडे? असा प्रश्नांचा भडीमारही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केला.
मोदी सरकार आणणे हाच आमचा अजेंडा
लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीमध्ये कधीच जागावाटपात कटुता नव्हती. आम्ही एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार उभे केले नाहीत.
आमची विचारधारा आणि आमचे टारगेट एकच आहे. मोदी सरकार आणणे हाच आमचा अजेंडा आहे. आता मजबूत भारत आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.





