Pune District | गुंजाळवाडी येथे आगीत दीड एकर ऊस जळून खाक

राजुरी : गुंजाळवाडी येथे आगीत दीड एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकर्याचे झाले तीन लाखांचे नुकसान झाले. गुंजाळवाडी (ता. जुन्नर)येथील खराडी मळा शिवारातील शेतकरी नवनाथ भाऊ औटी यांच्या गट क्र. (109) या शेतातील तोडणीला आलेल्या दिड एकर ऊसाला शनिवारी (दि. 7) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली.
लागलेली आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या शेतकर्यांनी तसेच नागरिकांनी विहिरीवरील पाण्याचा पंप चालू करून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आली नाही, त्यामुळे नवनाथ औटी यांचा दीड एकर ऊस आगीत जळून खाक झाला. नवनाथ औटी या शेतकर्याचे तीन लाखांचे रुपयांचे नुकसान झाले आहे; मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही; पण उसाच्या शेताच्या शेजारी विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर असून शेतामध्ये विद्युत पोल आहेत. ही आग ट्रान्सफॉर्मर जवळ स्पार्किंग होऊन आग लागली असल्याची स्थानिक शेतकरी मंगेश औटी, कैलास औटी, शामराव गुंजाळ जालिंदर औटी यांनी सांगितले.
तसेच स्थानिक नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधून शेतातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यास सांगितला. त्यानंतर घटनास्थळी विद्युत वितरणचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
गुंजाळवाडी (ता. जुन्नर) ः येथील शेतकरी नवनाथ औटी यांच्या उसाच्या शेताला लागलेली आग.





