कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न; लातूरचे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Kartiki Ekadashi 2024 | आज कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे कार्तिकीची शासकीय महापूजा करत असतात.
मात्र, सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने प्रशासनानं पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी ही महापूजा संपन्न झाली. यावेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.
विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सगर कुटुंबीय हे गेली 14 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात. यावेळी मंदिरे समितीच्या वतीने आचासंहितेचे पालन करून शासकीय महापुजेचा सोहळा संपन्न झाला.
प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना पुलकुंडवार म्हणाले की, “पांडुरंगाच्या कृपेनंच आपल्याला ही महापूजा करण्याचे भाग्य लाभले आहे. योगायोगानं आचारसंहिता सुरू असल्यानं शासनाचा आदेश मिळाला आणि हा महापूजा करण्याचा मान मिळाला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचं आयुष्य सुखकर होवो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, आनंदमयी जीवन होवो. याशिवाय निवडणूक शांततेनं पार पडावी ही मनातील सुप्त इच्छा पांडुरंग चरणी मांडली. मात्र, मला खात्री आहे, महाराष्ट्रातील निवडणूक नेहमीच शांततेनं पार पडते,” असा विश्वासही डॉ. चंद्रकांत पलकुंडवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पंढरपुरात भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज होत असलेल्या कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यानिमित्त संपूर्ण पंढरी नागरी विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे.
हेही वाचा:





