Pune | घराघरांत धर्म आणि विज्ञाचा समन्वय हवा

पुणे, – धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय घराघरांत झाला तर प्रत्येकाला शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो. हेच सूत्र समाजासाठी लागू झाल्याने विश्वशांती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, तसेच प्रत्येकाने चेहर्यावर हास्य ठेवणे या क्रांतिकारी प्रयोगामुळे ही जीवनात शांतीचा अनुभव येतो. प्रत्येकाने संकल्प करावा की घरामध्ये प्रवेश करताना चेहर्यावर हास्य ठेवावे, असे विचार उज्जैन येथील आध्यात्मिक गुरू पं. विजयशंकर मेहता यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे युनेस्को अध्यासनअंतर्गत २९ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, युनेस्को अध्यासनाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व व्याख्यानमालेचे समन्वयक व प्रकुलगुरू मिलिंद पांडे उपस्थित होते.
पंडित मेहता म्हणाले, की सामाजिक जीवनात वचन बद्धतेचे पालन करणे, कुटुंबाला प्राथमिकता देणे आणि स्वतःला शांत ठेवावे. यामुळे कुटुंबात, समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदेल. पैठणकर म्हणाले, आजच्या युगामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची वेगळी परिभाषा करणे योग्य नाही.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे, याची जाणीव या व्याख्यानमालेतून होते.





