‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “सध्या निवडणूक आयोग, कोर्ट या गोष्टी जोरात चालू….’

पुणे – पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात सोमवारपासून (20 फेब्रुवारी) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून, आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आतापर्यंत अनेक नेत्यांनी भेटी देत पाठिंबा दिला आहे. मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या उमेदवारांची भेट घेत आंदोलनस्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे ‘लोकसेवा आयोग’ बोलण्याऐवजी ‘निवडणूक आयोगावर’ घसरले असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नक्की काय म्हणायचे होते? असा प्रश्न निर्माण झाला होता. शिंदेच्या या अजब वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील देण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केल्याचं यावेळी दिसून आलं.
दरम्यान, आपण केलेल्या या व्यक्तव्यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “एमपीएससीच्या प्रश्नावर आम्ही तोडगा काढतोय याबाबत मुलांनाही बोललो आहे. माध्यमांशी बोलताना माझ्याकडून एमपीएससीचा विषय सुरू असतानाच निवडणूक आयोग हे शब्द माझ्याकडून अनावधानाने निघाले आहेत. सध्या निवडणूक आयोग, कोर्ट या गोष्टी जोरात चालू असल्यामुळे असे चुकून शब्द बोलून गेलो’. असं ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी आपण केलेल्या चुकीच्या विधानावरून ट्रोल करणाऱ्यांचा देखील एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलं.





