बारामती (पुणे) : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे तब्बल ८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याचा जल्लोष सत्ताधारी गट साजरा करत असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाच्या युवा नेत्याने आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट काकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार? युगेंद्र पवार म्हणाले, बिनविरोध झालेल्या ८ पैकी ४ जागांवर आमचे उमेदवार होते. एका उमेदवाराला थेट २० लाख रुपये देऊन अर्ज माघार घेण्यास भाग पाडले गेले. आमचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील, छोटे व्यावसायिक, कष्टकरी आहेत. दहा वर्ष नगरसेवक राहिले तरी त्यांना २० लाख कमवता येणार नाहीत. पण काकांनी सहज २०-२५ लाख देऊन आमची माणसे फोडली, असं युगेंद्र पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पैशाची सवय लावली आहे. प्रचंड पैसा, प्रचंड दबाव, संस्थांचा गैरवापर…सामान्य माणूस घाबरतो. आमच्यापुढे सत्ता आहे, पैसा आहे, यंत्रणा आहे. अशा वेळी दोन-तीन जण माघार घेतील हे स्वाभाविक आहे. लोकसभेपासून ते आता नगरपालिकेपर्यंत हाच पॅटर्न दिसतो आहे, असंही युगेंद्र पवार म्हणाले. या वेळी सामान्य घरातील, उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेच्या तरुणांना संधी द्या. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, मजबूत विरोधी पक्ष हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या, असं थेट आवाहन युगेंद्र पवार यांनी बारामतीकरांना यावेळी केलं.