Indian workers – परदेशांत कार्यरत असणाऱ्या भारतीय कामगारांच्या स्थितीविषयी अस्वस्थ करणारी आकडेवारी समोर आली. त्यानुसार, मागील ५ वर्षांत परकी भूमीत तब्बल ३७ हजार ७४० भारतीय कामगारांच्या मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच, दररोज सरासरी २० जणांचा मृत्यू झाला. ते प्रमाण आखाती देशांत सर्वांधिक असल्याचे स्पष्ट झाले. परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एक लेखी उत्तर दिले. त्यामध्ये वर्ष २०२१ ते २०२५ या कालावधीतील आकडेवारी उपलब्ध करण्यात आली. मात्र, मृत्यूची नेमकी कारणे नमूद करण्यात आली नाहीत. परदेशांत २०२१ यावर्षी सर्वांधिक ८ हजार २३४ भारतीय कामगारांचे निधन झाले. त्यापुढील वर्षी ती संख्या घटून ६ हजार ६१४ इतकी नोंदली गेली. त्यानंतरच्या ३ वर्षांत त्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. त्यानुसार, वर्ष २०२३ मध्ये ७ हजार २९१, त्यापुढील वर्षी ७ हजार ७४७, तर मागील वर्षी (२०२५) परकी भूमीत ७ हजार ८५४ भारतीय कामगार दगावले. भारतीय कामगारांच्या मृत्यूचे आखाती देशांतील एकुणात प्रमाण तब्बल ८६ टक्के आहे. मागील ५ वर्षांत संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) सर्वांधिक १२ हजार ३८० भारतीय कामगार मृत्युमुखी पडले. त्याखालोखाल सौदी अरेबियात ती संख्या ११ हजार ७५७ इतकी नोंदली गेली. कुवेतमध्ये ३ हजार ८९०, ओमानमध्ये २ हजार ८२१, मलेशियात १ हजार ९१५, तर कतारमध्ये १ हजार ७६० भारतीय कामगारांनी प्राण गमावले. मागील ५ वर्षांच्या कालावधीत परदेशांतील कार्यस्थळी होणाऱ्या पिळवणुकीशी संबंधित भारतीय कामागारांच्या ८० हजार ९८५ तक्रारी भारतीय दूतावासांना प्राप्त झाल्या. त्यापैकी सर्वांधिक १६ हजार ९६५ तक्रारी यूएईशी संबंधित आहेत. परदेशांत भारतीय कामगारांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांमध्ये वेतनातील विलंब किंवा वेतन न मिळण्याचा समावेश आहे.