आदित्य ठाकरेंचा आरोपांवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले,’राज्यात अनेक मोठे प्रकल्प निश्चित येतील

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर राजकारण तापले आहे. त्यातच रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दावोसमधून तीन दिवसांत 80 हजार कोटी आणल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार निघून गेले आहेत.’ असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
यावर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले आहे. मुनगंटीवार म्हणाले,’आरोप करणाऱ्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही. त्यांचे राजकारण हे केवळ सत्तेचं असून आपल्या परिवाराची उन्नती व्हावी, यासाठी आहे. ते पुढे म्हणाले,’नवे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी धोरणात काही बदल करण्याचा सरकार विचार करत आहे. त्यामुळे राज्यात अनेक मोठे प्रकल्प निश्चित येतील, याची मला खात्री आहे.’





