बुलडाण्यातही ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

बुलडाणा – मुंबई, पुण्यापाठोपाठ आता विदर्भ, मराठवाड्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा ओमायक्रॉनचा आज पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णाचे नमुने पुण्याला पाठवले होते. आज रिपोर्ट हाती आले असता या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
बुलडाणा शहरात मंगळवारी एक करोना पॉझिटिव्ह प्रवाशी हा दुबईवरून परतला आहे. आणि आठ दिवसांपूर्वी दुबईमध्ये ओमीक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सदर व्यक्तीचा स्वॅब ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.
दुबईवरून आलेली ही व्यक्ती चार दिवसांपूर्वी बुलडाण्यात परतली. ते परत आल्यानंतर या व्यक्तीची करोना चाचणी करण्यात आली, तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह मिळाला. दुबईमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे या करोनाग्रस्ताची ओमायक्रॉन चाचणी घेण्यात आली असता रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहे.





