Withdrawal Of Monsoon: महाराष्ट्रातून परतीचा पावसाची एक्झिट! कोकणाला ‘उष्णतेचा यलो अलर्ट’; तुमच्या शहरात कसे असेल हवामान?
Withdrawal Of Monsoon: पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रातून अधिकृतपणे बाहेर पडणार; मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा.

Withdrawal Of Monsoon- गेल्या २४ तासांत महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून परतीचा पाऊस (मान्सून) निघून गेला असून, पुढील दोन दिवसांत मान्सून राज्याबाहेर पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने निराशा केली आहे. पुढील २४ तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असल्याने तिथे उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात सध्या एकाच वेळी वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव येत आहे. पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश प्रामुख्याने निरभ्र राहून दुपारनंतर ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहर व जिल्ह्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. उष्णतेचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. मात्र, रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) दुपारनंतर काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली.
कमाल तापमानातही किंचित घट झाली असून, वडगावशेरी येथे ३५.१, दौंड परिसरात ३५, तर चिंचवड आणि शिवाजीनगर येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या पुणे शहरासह उपनगरांमध्ये विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. शहरात दुपारी कडक ऊन, अधूनमधून ढगाळ वातावरण, तर रात्री आणि पहाटे गारवा अशा तिहेरी हवामानाचा अनुभवत घेत आहेत. या हवामान बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
शहरासह जिल्हाही कोरडाच!
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेल्या पुणेकरांचा परतीच्या पावसानेही अपेक्षाभंग केला आहे. शहर आणि जिल्ह्यातून परतीचा पाऊस कोणताही जोर न धरता कोरडाच गेला असून, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातून अधिकृतपणे रवाना होईल. वेधशाळेने पुण्यातून मान्सून माघारी फिरल्याचे घोषित केले आहे. दीड महिन्यांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.





