Omraje Nimbalkar : “तो निर्णय स्वखुशीने नव्हता…” ओमराजेंनी पहिल्यांदाच सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण!
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असणाऱ्या ओमराजेंवर या निर्णयानंतर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली होती.
विरोधात राहिल्याने मतदारसंघामधील विकासकामे अडकत असल्याचे कारण त्यावेळी समोर आले होते. मात्र, आता पहिल्यांदाच त्यांनी या भूमिकेमागील खरी खंत आणि अंतर्गत वास्तव जाहीरपणे मांडत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कोणताही माणूस इतका मोठा राजकीय निर्णय सहजासहजी किंवा स्वतःच्या आनंदाने घेत नाही, असे सांगत ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, नगरपंचायत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असो, आमचे काम एवढे वाईट होते का की एकही नगरपालिका किंवा पंचायत समिती आमच्या वाट्याला येऊ नये? आम्ही २४ तास जनतेमध्ये वावरणारे, लोकांसाठी झटणारे कार्यकर्ते आहोत. इतके काम करूनही जर अशा पराभवांना सामोरे जावे लागत असेल, तर मग माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी याचा नेमका काय अर्थ काढायचा, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.
याच स्थानिक राजकीय कोंडीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी वेगळा मार्ग निवडावा लागल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय, आज दोन्ही शिवसेनांचे नेते जरी स्वतंत्र मार्ग चोखाळत असले, तरी शिवसेना पुन्हा एकत्र आली तरच सामान्य जनतेचे आणि महाराष्ट्राचे खरे कल्याण होईल, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना असल्याचे महत्त्वाचे विधानही त्यांनी केले.
राजकीय घडामोडींवर भाष्य करतानाच ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जुलमी वसुलीवर त्यांनी कडक इशारा दिला.
फायनान्स कंपन्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या दारात जाऊन सक्तीची वसुली करू नये, कोणाला अडवून दमदाटी करू नये किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये असा त्रास देणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड दम त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले की, १९७२ चा दुष्काळही महाभीषण होता, तरीही जनतेने त्यावर धैर्याने मात केली होती. संकटात टोकाचे पाऊल उचलल्याने समस्या सुटत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या कठीण प्रसंगाला आत्मविश्वासाने सामोरे जा, असे भावनिक आवाहन त्यांनी (Omraje Nimbalkar) बळीराजाला केले.






