Omar Abdullah : परदेशी जाणे गुन्हा आहे का? उमर अब्दुल्ला यांनी केले राहुल गांधीचे समर्थन

जम्मू : परदेशी जाणे गुन्हा आहे का? पंतप्रधान, मंत्र्यांसह अनेक जण परदेश दौरे करतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही कुठेही जाण्याची आणि कुणाशीही बोलण्याची मोकळीक आहे, अशा शब्दांत त्यांचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जोरदार समर्थन केले. राहुल सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी जर्मनीत भारतविरोधी शक्तींची भेट घेतल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावर उमर यांनी प्रतिक्रिया दिली.
भारतविरोधी कुठल्या व्यक्तीची राहुल यांनी केव्हा भेट घेतली? सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही परदेशी जाण्याची मुभा आहे. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी परदेशांत चर्चा-संवाद प्रक्रियेत सहभागी होणे राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील सामान्य बाब आहे. त्यामुळे भाजपने आक्षेप का घ्यावा, असा प्रतिसवाल उमर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राहुल नियमितपणे परदेश दौरे करतात. तशा दौऱ्यांवेळी त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी, मांडलेली भूमिका चर्चेचे विषय ठरतात. त्यावरून अनेकदा भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जुंपल्याचेही पाहावयास मिळते.





