Omar Abdullah : इंडिया आघाडीचे नेतृत्व कॉंग्रेसने गृहीत धरू नये; उमर अब्दुल्ला यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्व कॉंग्रेसने गृहीत धरू नये. ते स्थान कॉंग्रेसने कमवावे, अशी स्पष्टोक्ती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे आघाडीच्या नेतृत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातून आघाडीतील लहान पक्षांमधील अस्वस्थता आणि कॉंग्रेसविषयीची असंतुष्टताही चव्हाट्यावर आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी आघाडीतील असंतुष्टतेची बाब उमर यांनी मान्य केली. त्याच वेळी कॉंग्रेसचे महत्वही अधोरेखित केले. संसदेत कॉंग्रेस विरोधी बाकांवरील सर्वांत मोठा पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद त्या पक्षाकडे आहे. कॉंग्रेसचे देशभर अस्तित्व आहे. त्यामुळे त्या पक्षाकडे स्वाभाविकपणे विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व आहे.
तसे असले तरी काही पक्षांमध्ये अस्वस्थता दिसते. त्याचे कारण म्हणजे नेतृत्व टिकवण्यासाठी कॉंग्रेस फारसे काही करत नसल्याचे त्यांना वाटते. त्यावर कॉंग्रेसने विचार करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. आघाडीची व्यवस्था केवळ निवडणुकांपुरती नसावी. निवडणुकांपलिकडे जाऊन आघाडीत सतत संवाद असायला हवा, असेही त्यांनी सुचवले. उमर यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष इंडिया आघाडीचा घटक आहे. त्यांनी कॉंग्रेसने आघाडीचे नेतृत्व करण्याला विरोध दर्शवला नसला तरी मांडलेली भूमिका महत्वाची आहे.





