ओला इलेक्ट्रिक कंपनीचा तोटा वाढला

बंगळुरू – ओला इलेक्ट्रिक खर्च कमी करून नफादायक होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चौथ्या तिमाहीत या कंपनीला झालेला तोटा वाढून 870 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या ती माहित कंपनीला 416 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
या तिमाहीत कंपनीचा महसूल कमी होऊन 611 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 1,598 कोटी रुपये इतका होता. सरलेल्या पूर्ण वर्षांमध्ये कंपनीचा तोटा वाढून 2,276 कोटी रुपये झाला आहे. त्या अगोदरच्या वर्षांमध्ये कंपनीचा तोटा 1,584 कोटी रुपये इतका होता.
सरलेल्या पूर्ण वर्षांमध्ये कंपनीचा महसूल कमी होऊन 4,514 कोटी रुपये झाला आहे. त्या अगोदरच्या वर्षांमध्ये कंपनीचा महसूल 5,010 कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनी निश्चित नफ्यात येईल अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 3,59,221 वाहनांची विक्री केली. इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात कंपनीचे नेतृत्व कायम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनी आपल्या वाहनांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीची विक्री वाढून कंपनी नफ्यात देण्यास मदत होईल असे सांगण्यात आले.





