Ola Electric Company : ओला इलेक्ट्रिक कंपनी मोठ्या संकटात; हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

Ola Electric Company : आपल्या ईव्ही स्कूटरने बाजारात खळबळ उडवून देणारी ओला इलेक्ट्रिकची अवस्था वाईट आहे. एकीकडे शेअर बाजारात ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स घसरत आहेत, तर दुसरीकडे कंपनीचा तोटा सतत वाढत आहे. परिस्थिती अशी बनली आहे, की ओला इलेक्ट्रिक कंपनीने खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाढता तोटा कमी करण्यासाठी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कपात विक्री, पुरवठा, ग्राहक संबंध, चार्जिंग पायाभूत सुविधा इत्यादी सर्व विभागांमधून केली जाईल. भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी तोटा कमी करण्याच्या उद्देशाने १,००० कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकू शकते.
गेल्या पाच महिन्यांत दुसरी कपात
सोमवारी आलेल्या वृत्तानुसार, सॉफ्टबँक-समर्थित दुचाकी इलेक्ट्रिक वाहन कंपनी अनेक विभागांमधून ही कपात करेल. यामध्ये ग्राहक संबंध, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि खरेदी यासारख्या विभागांचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही दुसरी कर्मचारी कपात आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये कंपनीने सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
मार्च २०२४ पर्यंत, ओला इलेक्ट्रिकमध्ये सुमारे ४,००० कर्मचारी होते. नवीन कपातीचा परिणाम २५ टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांवर होईल. अहवालांनुसार, कंपनी तिच्या ग्राहक संबंध ऑपरेशन्सचे काही भाग स्वयंचलित करत आहे आणि व्यवसायाच्या गरजेनुसार टाळेबंदी देखील बदलली जाऊ शकते. त्याचबरोबर अनावश्यक पदं हटवून उत्पादकता वाढविण्यात आली आहे.
ओला इलेक्ट्रिकला बाजारात पारंपारिक कंपन्यांकडून कडक स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फेब्रुवारीमध्ये त्यांनी २५,००० हून अधिक युनिट्स विकल्या आहेत आणि त्यांचा बाजारातील वाटा २८ टक्के आहे. तथापि, वाहन पोर्टलनुसार, गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिकच्या ८,३९० दुचाकी ईव्ही वाहनांची नोंदणी झाली.
शेअर्सची वाईट स्थिती
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आला होता, तेव्हापासून तिचा शेअर त्याच्या शिखरावरून ६० टक्क्यांनी घसरला आहे. दुपारी १:२० वाजता, ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर ३.२२ टक्क्यांनी घसरून ५४.९४ रुपयांवर व्यवहार करत होते.
कंपनीचे नुकसान
ओला इलेक्ट्रिकने आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीत कमकुवत निकाल दिले होते. ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत कंपनीचा तोटा ५६४ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत झालेल्या ४९५ कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा १३.९४ टक्के जास्त आहे. ओला इलेक्ट्रिकचा तोटा वार्षिक आधारावर ५० टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला ३७६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. शेअर बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे तोटा वाढला आहे, असे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
कंपनीचा तोटा सतत वाढत
ओला इलेक्ट्रिक १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. तोटा कमी करण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीकडून हे पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचा तोटा सतत वाढत आहे. कंपनीचा महसूल वाढला असला तरी नफाही कमी झाला आहे, त्यामुळे कंपनी हा निर्णय घेत आहे.
कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड?
ओला इलेक्ट्रिकने गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, ज्यामध्ये मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा तोटा वाढला.
या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 564 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत झालेल्या 376 कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा खूपच जास्त आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 19.4 टक्क्यांनी घसरून 1,045 कोटी रुपयांवर आला आहे.
ओला इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना कधी झाली?
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी ही एक भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी २०१७ मध्ये भाविश अग्रवाल यांनी स्थापन केली आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची उत्पादन करते, यामध्ये ओला एस१ एअर, ओला एस१ एक्स आणि एस१ प्रो असे तीन प्रकार ओला एस१ मध्ये आहेत.
इलेक्ट्रिक दुचाकीच्या किमती
S1 Pro+ (5.3kWh) – ₹1,69,999
S1 Pro+ (4kWh) – ₹1,54,999
S1 Pro (4kWh and 3kWh) – ₹1,34,999 आणि ₹1,14,999
S1 X – ₹79,999 (2kWh), ₹89,999 (3kWh) आणि ₹99,999 (4kWh)
S1 X+ (4kWh) – ₹1,07,999





