India’s oil purchases : रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार.! ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट
भारताने ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण करण्यावर भर दिला आहे. रशियाबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांसारख्या देशांकडूनही एलपीजी आयात करण्याचे करार करण्यात आले आहेत.

India’s oil purchases – अमेरिकेने रशियन तेल खरेदीवरील ३० दिवसांची सवलत उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही भारत रशियाकडून कच्चे तेल आणि एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) आयात सुरू ठेवणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत भारताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने मार्चमध्ये जागतिक पुरवठा संकट लक्षात घेऊन तात्पुरती सवलत दिली होती, ज्यामुळे भारतासह काही देशांना रशियन तेल खरेदी करता येत होते. मात्र ही सवलत एप्रिलमध्ये संपली असून ती पुढे वाढवली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तरीही, भारताच्या आयात धोरणावर याचा मोठा परिणाम होणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. भारत रशियाकडून तेल आणि एलपीजी खरेदी सुरू ठेवणार असून, हे व्यवहार प्रामुख्याने गैर-प्रतिबंधित कंपन्यांमार्फत केले जातील. तसेच पुढील काळात रशियाकडून अधिक एलपीजी खरेदीसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, भारताने ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण करण्यावर भर दिला आहे. रशियाबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांसारख्या देशांकडूनही एलपीजी आयात करण्याचे करार करण्यात आले आहेत. सध्या भारताच्या गरजांचा मोठा भाग मध्यपूर्वेवर अवलंबून असला तरी, तिथल्या भू-राजकीय तणावामुळे पर्यायी स्रोत शोधणे आवश्यक झाले आहे.





