इजिप्तजवळ तेलासाठी खोदकाम करणारे जहाज बुडाले

कैरो – तेलोसाठी खोदकाम करणारे एक जहाज सुएझ च्या आखातामध्ये बुडाले असून या दुर्घटनेत किमान ४ कर्मचारी मरण पावले आहेत. तर अन्य ४ जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. सुएझच्या आखातामद्ये आफ्रिकेच्या बाजूला रास घारेब शहराजवळ मंगळवारी संध्याकाळी हे जहाज उलटले होते.
सुएझचे आखात हा लाल समुद्राच्या वायव्येकडील प्रमुख सागरी मार्ग असल्याचे इजिप्तच्या पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे. समुद्रात बुडाले तेंव्हा या जहाजावर एकूण ३० कर्मचारी होते. बचाव पथकाला घटनास्थळी ४ मृतदेह सापडले असून २२ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
या सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे लाल समुद्र प्रांताचे गव्हर्नर अमिर हानाफी यांनी म्हटले आहे. इजिप्त नौदलाची जहाजे मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी झाली असून हे मदत आणि बचावकार्य अजूनही सुरू आहे. बेपत्ता झालेल्या चार कर्मचाऱ्यांचा शोध देखील अजून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
तेलासाठी उत्खनन करणारे हे जहाज का बुडाले, याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या कारणांचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्खननासाठी दुसऱ्या भागात ओढून नेले जात असताना ते उलटले, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
इजिप्तचे प्रमुख तेल उत्पादन केंद्र असलेल्या गाबेल झेत या सुएझ कालव्याच्या दक्षिणेकडे ३०० किलोमीटरवर असलेल्या भागात हे जहाज उलटले होते. हा सागरी मार्ग सुएझचे आखात आणि भूमध्य समुद्राला जोडतो. जहाज बुडाल्यामुळे या सागरी मार्गावरील वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा आलेला नाही.





