अरे बापरे ! पाण्यातसुद्धा विष आहे…

नवी दिल्ली – पाणी हे जीवन आहे असे शाळेत असतानाच शिकवले जाते. तसेच पाण्याचे काय फायदे आहेत व ते शरीरासाठी कसे आवश्यक आहे तेही सांगितले जाते. मात्र, आपण पित असलेले पाणी विषारी आहे, असे जर कोणी सांगितले तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही बातमी धक्कादायक असली तरी ती खरी आहे.
केंद्र सरकारनेच पाण्याचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असल्याची कबुली संसदेत दिली आहे. सरकारने राज्यसभेत याबाबतची जी आकडेवारी मांडली आहे ती केवळ धक्कादायकच नाही तर हादरविणारीही आहे. जे सांगण्यात आले ते जर खरे असेल तर आपण इतके दिवस जीवन म्हणून जे पाणी पित होतो ते विषारी होते हे मानावे लागेल. भूगर्भात जे पाणी आहे, त्यात विषारी घटकांचे प्रमाण खूपच वाढले आहे. बरे ही समस्या केवळ एखाद्या राज्यापुरती मर्यादित नाही तर सगळीच राज्ये आणि त्यातील सगळ्याच जिल्ह्यांत ही स्थिती आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात घातकी धातूंचे पाण्यातील प्रमाण जास्त असल्याचेही आढळून आले आहे.
एका इंग्रजी संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे-
* 25 राज्यांतील 209 जिल्ह्यांतील काही भागात भूगर्भातील पाण्यात अर्सेनिकचे प्रमाण प्रति लिटर 0.01 एमजीपेक्षा जास्त आहे.
* 29 राज्यांतील 491 जिल्ह्यांच्या काही भागात पाण्यातील लोहाचे प्रमाण प्रतिलिटर 1 एमजीपेक्षा जास्त आहे.
* 11 राज्यांच्या 29 जिल्ह्यांच्या काही भागात कॅडमियमचे प्रमाण प्रतिलिटर 0.003 पेक्षा जास्त आढळून आले आहे.
* 16 राज्यांतील 62 जिल्ह्यांच्या काही भागात क्रोमियमचे प्रमाण प्रतिलिटर 0.05 एमजीपेक्षा जास्त आहे.
* 18 राज्यांतील 152 जिल्हे असे आहेत की जेथे भूगर्भातील पाण्यातील युरेनियमचे प्रमाण प्रतिलिटर 0.03 एमजीपेक्षा जास्त आहे.
* जलशक्ती मंत्रालयाने सादर केलेल्या माहितीनुसार देशातील 80 टक्केपेक्षा जास्त नागरिकांना भूगर्भातूनच पाणी मिळते. जर या पाण्यातील धातूंचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते पाणी विषारी आहे.
* ज्या निवासी भागांतील पाणी प्रदूषित झाले आहे, त्याचीही माहिती देण्यात आली. भारतातील निम्मे लोकसंख्या ग्रामीण भागांत राहते तेथील स्थिती शहरी भागांपेक्षा अधिक वाईट आहे.
हॅंडपंप, विहिरी, नद्या आणि तलाव हे येथील पाण्याचे स्त्रोत असतात. येथे पाणी थेट जमिनीतून येते. त्याशिवाय पाणी स्वच्छ करण्याची तेथे पुरेशी व्यवस्था नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना विषारी पाणीच प्यावे लागते आहे. एक व्यक्ती दिवसाला सरासरी 3 लीटर पाणी पितो. सरकारच्या म्हणण्यानुसार आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर दिवसाला किमान 2 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्ही दिवसाला दोनच लिटर पाणी पीत असाल तरी तुमच्या शरीरात काही प्रमाणात हे विष जात असेल. दरम्यान, पिण्याचे पाणी हा राज्यांचा विषय असला तरी नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी सरकारने पुढाकार घेत काही योजना सुरू केल्या असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.




