पिंपरी | मतदानादिवशी सुट्टी साजरी करणारे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी अडचणीत

पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व विभागातील प्रथम, द्वितीय, तृतिय आणि चतुर्थ श्रेणीतील अधिकारी व कर्मचारी यांना 7 आणि 13 मे रोजी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली. परंतु, शंभर टक्के मतदान नोंदविण्यात अधिकारी, कर्मचारी यांना अपयश आले.
यामुळे मतदानाचा हक्क बजावलेले व मतदानाचा हक्क न बजावलेल्या महापालिकेतील सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांची नावासह माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागवून घेतली आहे. यामुळे मतदानाच्या नावाखाली सुट्टी साजरी करणा-या अधिकारी व कर्मचारी वर्गात चांगलीच खळबळ माजली आहे.
लोकसभेच्या बारामती मतदार संघासाठी 7 मे रोजी तर मावळ आणि शिरुर मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमधील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी, सहकारी आदी आस्थापनांमधील कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. परंतु, मतदानाचा टक्का वाढवण्यात निवडणूक विभागाला पूर्णपणे अपयश आले.
आता 7 आणि 13 मे रोजी मतदान केलेल्या व न केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले आहेत. स्वतंत्र फॉर्म देऊन त्यामध्ये प्रथम विभागाचे नाव, मतदान दिनांक, एकुण अधिकारी व कर्मचारी संख्या,
मतदान केलेले अधिकारी व कर्मचारी संख्या, आणि मतदान न केलेले अधिकारी व कर्मचारी संख्या 15 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता विहीत नमुन्यात [email protected] या अधिकृत मेलवर मागविण्यात आली आहे. यासाठी निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व विभागाप्रमुखांना संबंधित माहिती त्वरीत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणुकीच्या पाच टप्प्यातील माहिती मागवा
जिल्हाधिकारी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांची माहिती मागविली असली तरी ती 7 आणि 13 मे या निवडणुकीच्या दोनच टप्प्यातील माहिती मागविली आहे. पाच टप्प्यात होणा-या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुट्टी घेणा-या अधिकारी, कर्मचारी यांची माहिती मागवणे अपेक्षित असताना दोनच टप्प्यातील माहिती का मागविण्यात आली ?,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पाच टप्प्यात होणा-या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुट्टीवर जाणा-या अधिकारी व कर्मचारी यांची माहिती मागवून त्यात मतदान केलेले व मतदान न केलेले अधिकारी व कर्मचारी शोधावेत.
दोनच टप्प्यात मतदान केलेले व मतदान न केलेले अधिकारी व कर्मचा-यांची माहिती घेऊन नेमके कोणावर कारवाई करणार आणि कोणाला पाठीशी घालणार ?, असा प्रश्न कर्मचा-यांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीच्या पाच टप्प्यातील माहिती मागवून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना पालिकेतील कर्मचा-यांनी केली आहे.





