पुणे जिल्हा | लोकन्यायालयात अधिकार्यांचीच दांडी

मंचर, (प्रतिनिधी) – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे भरवण्यात आलेल्या लोकन्यायालयात पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला, अखेर नागरिकांना हेलपाटा बसला. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
पिंपळगाव तर्फे महाळुंगे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकांना लोकांना घरपट्टी बद्दल घोडेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नोटीस पाठवली. या नोटीसी प्रमाणे अनेक शेतकरी, घरमालक दिवाणी न्यायालयात रविवारी (दि. 3) सकाळी 10 वाजता घरपट्टी बद्दल तडजोडीसाठी उपस्थित होते; परंतु दुपारी एक वाजेपर्यंत पंचायत समिती विभागाचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते.
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना फोनवर संपर्क साधला असता ते एका लग्नाच्या साखरपुड्यामध्ये व्यस्त होते. इतर अधिकार्यांना फोन लावले. तेही उपलब्ध झाले नाही. पिंपळगाव तर्फे महाळुंगे ग्रामपंचायतीचे क्लार्क, शिपाई फक्त उपस्थित होते; मात्र नोटीसीद्वारे हजर राहण्याच्या आदेश दिला. हा प्रकार खर्या अर्थाने निंदनीय आहे.
अधिकारी बेजबाबदारपणे…
अधिकारी असेच जर बेजबाबदारपणे वागत राहिले तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार सामान्य माणूस शासकीय कार्यालयात उशिरा जर गेला तर त्याला अनेक जबाब विचारले जातात. पण अधिकार्यांना कोणी जाब विचारायचा ही खर्या अर्थाने शोकांतिका आहे.
या नोटीस तडजोडी करण्यासाठी दिल्या होत्या; परंतु तिथे जाऊन तडजोड नेमकी कोणाबरोबर करायची हाच मोठा प्रश्न होता; परंतु घडला प्रकार हा मनस्ताप निर्माण करणार आहे. याची दखल नक्की कोण घेणार? – बाजीराव बांगर, अध्यक्ष, स्वराज्य संघ, महाराष्ट्र राज्य
घोडेगाव (ता. जुन्नर) : येथे भरवण्यात आलेल्या लोकन्यायालयात पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.





