Satara: कृत्रिम विसर्जन तळ्याची पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडून आढावा
Satara गणेशोत्सवात शहरातील विविध मंडळांसह घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बुधवार नाका परिसरात मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कृत्रिम विसर्जन तळ्याची तयारी, परिसरातील स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे.

Satara: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी सातारा नगरपालिका प्रशासनाने तयारी सुरु केली असून बुधवार नाका परिसरातील कृत्रिम विसर्जन तळे आणि विसर्जन मार्गाची नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी पाहणी करुन तयारीचा आढावा आज घेतला. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षितता तसेच भाविकांच्या ये- जा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
गणेशोत्सवात शहरातील विविध मंडळांसह घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बुधवार नाका परिसरात मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कृत्रिम विसर्जन तळ्याची तयारी, परिसरातील स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. विसर्जनाच्या वेळी गर्दीचा ताण वाढू नये, यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तसेच भाविकांच्या सुरक्षित हालचालींची व्यवस्थाही तपासण्यात आली.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी विसर्जन तळ्याची पाहणी करताना परिसरातील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नगरपालिका यंत्रणेने सज्ज राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी कृत्रिम विसर्जन तळ्यावरील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भाविकांची ये- जा, मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. विसर्जनानंतर परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त स्वच्छता पथके तैनात करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. यावेळी गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज शेंडे, अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे, रविराज किर्दत, बांधकाम विभागाचे उपअभियंता विनोद दहिफळे, नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे यांच्यासह नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





