छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह लिखाण; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर इंग्रजीत आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे. यासंदर्भात, आपण सायबरच्या आयजींना सांगितले आहे. तसेच, विकिपीडियावर संपर्क करत याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आपल्याला कल्पना आहे की विकिपीडीया हे भारतातून संचालित होत नाही, त्यांचे नियम आहेत. यासंदर्भातील एडिटोरीयल राईट्स कोणाकडे असतात हे पाहिलं जाईल. ऐतिहासिक गोष्टी तोडून मोडून करण्यापेक्षा नियमावली तयार करा, अशा सूचना आपण देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
माध्यमांची भौगोलिक रचना होती, मात्र आता समाज माध्यमामुळे ती नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणीही घाला घालू शकत नाही. यासंदर्भात नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरू आहे. दरम्यान, विकिपीडियातील मजकूरसंदर्भात कारवाई केली जाईल, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.





