October Heat : शहराला ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा ; पारा ३६ अंशांवर पोहोचला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वाढत्या तापमानामुळे शहरातील ऑक्टोबर हीट दिवसेंदिवस वाढत असून उकाडाही चांगलाच वाढला आहे. गुरूवारी (दि. १६) शहरात कमाल तापमान ३६ अंशावर पोहचले आहे. गेल्या २४ तासांत दोन ते तीन अंशाने कमाल तापमान वाढले आहे.शहरासह जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून दिवसभर ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी तर रात्री गारवा, अशा तीनही ऋतुंचा अनुभव सध्या पुणेकर घेत आहे. मात्र, हे बदलते हवामान पुणेकरांचे आरोग्य बिघडविणारे आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कमाल तापमान ३० अंशापर्यंत खाली आले.
मात्र, गेल्या ४८ तासांत कमाल तापमान झपाट्याने वाढ झाली आणि शहरातील दापोडी येथील कमाल तापमान ३६ अंशावर जावून पोहचले. तळेगांव येथे ३५, तर चिंचवड परिसरात ३२.९, वडगावशेरी येथे ३२.२, शिवाजीनगरला ३१.८, बारामतीमध्ये ३१.५, पाषाण आणि हवेली परिसरात ३१.३, एनडीए येथे ३०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरात सकाळी आकाश निरभ्र तर दुपारनंतर अंशत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.




