October Heat: ऑक्टोबर हिटने पुणे तापले! लोहगाव ३५.८ अशांवर
October Heat:

उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाही लाही
October Heat: शहर परिसरात ऑक्टोबर हिटचा चटका चांगलाच जाणवू लागला असून, शहराचे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. लोहगाव भागात तर पारा ३५.८ अंशांवर नोंदवला गेला असून, दुपारच्या वेळी पुणेकरांना कडक उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती येथे राज्यातील सर्वोच्च ३९.० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उष्णतेचा पारा ४० शीच्या दिशेने वाटचाल करत असून, ऑक्टोबरमध्येच उन्हाळा सुरू झाल्याची नागरिकांची भावना आहे.
पुणे शहरात कमाल तापमान ३५.२ तर किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस राहिले. लोहगाव येथे सर्वाधिक कमाल ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी दिवसभर उन्हाचा चटका अंगाची लाहीलाही करत असून, उकाड्याने पुणेकर हैराण झाले.
दुपारनंतर तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. पुढील दोन दिवस शहरात शहरात कमाल तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. तसेच राज्यातील इतर शहरांचा विचार केला असता, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे ३६.५ तर धाराशिव येथे ३४.२ अंश कमाल तापमान राहिले.
विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून यवतमाळ ३८.२, अकोला ३७.९, वर्धा ३७.६ आणि नागपूर येथे ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला, बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागात अंशतः पाऊस किंवा ढगाळ वातावरण होते.
कोकण आणि मुंबई विभागात उकाडा कायम असून, सांताक्रूझ येथे ३५.४ तर रत्नागिरीत ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सध्या राज्यात दिवसा कडक ऊन आणि रात्री काही ठिकाणी थंडी असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे.




