October Heat: ऐन पावसाळ्यात पुणेकरांना ऑक्टोबर हीटचा अनुभव
October Heat:

कमाल तापमान ३३ अंशाच्या पुढे, चार दिवसांनंतर पावसाच्या आगमनाची शक्यता
October Heat: शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. परिणामी, कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा कमालीचा वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत शहरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले गेले असून, नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत ऐन ऑक्टोबर हीटसारखा अनुभव येत आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मान्सून सक्रिय झाला. त्यावेळी शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, तर घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता.
मात्र, आता पावसाचा जोर ओसरल्यानंतर कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून, गेल्या ४८ तासांत अजून २ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर ऊन आणि अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असल्यामुळे उकाडा जाणवत आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील बारामती येथे सर्वाधिक ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ दापोडी येथे ३२.१, चिंचवड ३१.७, पाषाण, हवेली व वडगावशेरी येथे ३१.६, हडपसर येथे ३१.५, तर शिवाजीनगर येथे ३१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. पुणेकरांना या उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून दुपारनंतर अंशतः ढगाळ आकाश राहील. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविली आहे. तसेच जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर अधिक वाढेल, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.




