पुणे | वारीच्या वाटेत खड्ड्यांचा अडथळा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी महापालिका आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर, तातडीने पालखी मुक्कामी असलेल्या भवानीपेठ परिसरात, रस्त्यांकडेला असलेला राडारोडा काढण्यासह, या भागात स्वच्छता करून पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते.
मात्र, आयुक्तांच्या आदेशानंतरही पथ विभागास लक्ष्मी रस्त्यावरील तसेच पालखी मुक्कामी असलेल्या मंदीर परिसरात रस्ते दुरूस्त करण्यास वेळ मिळालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याकडेला राडारोडा पडून आहे.
मुख्य रस्त्यावरच खड्डे…
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या ३० जूनला पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी येणार आहे. शहरात या दोन्ही पालख्या भवानी पेठेतील निवडुंग्या विठोबा आणि पालखी विठोबा मंदीरात मुक्कामी असतात. हा दोन्ही पालख्या टिळक चौकातून लक्ष्मी रस्त्याने भवानी पेठेतील या दोन्ही मंदीरात विसावतात.
मात्र, लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारूती चौकापासून पुढे दोन्ही मंदीरांपर्यंत अनेक ठिकाणी सिमेंटचा रस्ता ड्रेणेज लाईनसाठी खोदण्यात आला होता. हे काम झाल्यानंतर तो पुन्हा काँक्रीटने भरलेला आहे.
मात्र, हे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तर, काही ठिकाणी खचलेल्या चेंबरची दुरूस्ती केलेली असून त्याचे पाइप, राडारोडा तसाच रस्त्याकडेला पडला आहे. त्यामुळे महापालिका नेमकी कशाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पावसाळी चेंबर अस्वच्छच…
शहरात झालेल्या पूर्वमोसमी पावसाने काही दिवसांपूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. महापालिकेकडून पावसाळी वाहिन्यांची सफाई न केल्याने पावसानंतरही अनेक भागात ड्रेणेजचे पाणी वाहत होते.
त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे पुन्हा पाऊस झाल्यास पाणी साचण्याची भिती आहे ही बाब लक्षात घेता तत्काळ स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.




