हरकती, सूचनांमध्येच अडकला मेट्रोचा “टीओडी’

बांधकाम प्रस्तावांना महापालिकेचा “रेड सिग्नल’
पुणे – मेट्रो प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या प्रभाव क्षेत्र (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) राज्य शासनाने वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे. त्यासाठी मार्चमध्ये शासनाने या निर्णयावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या.
आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शासनाकडून अद्यापही आलेल्या हरकती आणि सूचनांवर अजून अंतिम निर्णय घेतलेला नसल्याने या प्रभाव क्षेत्रातील बांधकामांना महापालिकेडून ‘रेड सिग्नल’ दाखविण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मेट्रो प्रकल्पाला निधी उभारण्यासाठी राज्य शासनाने “टीओडी’ धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांकडे प्रकल्प दाखल करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, शासनाने हे धोरण जाहीर केल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर पालिकेनेही आपल्या हरकती नोंदविल्या होत्या. त्याची सुनावणी झाल्यानंतर हा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला असला, तरी अद्याप त्यावर अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे पालिकेने घेतलेल्या आक्षेपांचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.



